भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल जवळील रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ईश्वर बबन पाटील (रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शुक्रवारी, ९ मे रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर बबन पाटील आणि त्यांचे मित्र नरेंद्र मनोहर मिस्त्री (रा. गेंदालाल मिल, जळगाव) हे दोघे बुधवारी ७ मे रोजी रात्री साडेआठ वाजता गेंदालाल मिल जवळील रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने पुढे चालणाऱ्या ईश्वर पाटील यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ईश्वर पाटील यांना तातडीने एका खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नरेंद्र मिस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी ९ मे रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू ओढवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत.

Protected Content