भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी, ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात वास्तव्यास असलेली २१ वर्षीय तरुणी भुसावळ येथे खाजगी क्लासेसला जाते. याच दरम्यान, संशयित आरोपी दर्शन अनंत चिंचोले, वय २१ वर्षे रा.भुसावळ, हा मागील सहा महिन्यांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता. तो तिला प्रेमसंबंध ठेवण्याची आणि लग्न करण्याची मागणी करत होता.
शुक्रवारी ९ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता दर्शन चिंचोले याने तरुणीचा हात पकडला आणि तिला धमकी दिली की, मी आत्महत्या करून तिला फसवेल. या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दर्शन अनंत चिंचोली याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करत आहेत.