रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी महामानवांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांततेत आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी केले. सार्वजनिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवणे प्रतिबंधित असून, असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनमध्ये नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक जयस्वाल बोलत होते. तहसीलदार बंडू कापसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रावेर शहर आता संवेदनशील राहिलेले नाही. येथील नागरिक सामाजिक ऐक्य जपत उत्सव शांततेत साजरे करतात. त्यामुळे सर्वांनी पुढीलही सर्व सण-उत्सव सलोख्याने साजरे करावेत, असे त्यांनी सांगितले.मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी मिरवणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, भाजपाचे नितीन पाटील, डॉ. सुरेश पाटील, ॲड. योगेश गजरे, शैलेश अग्रवाल, गयास शेख, बाळू शिरतुरे, विजय लोहार, दिलीप कांबळे, पंकज वाघ, युसूफ खान, अब्दुल रफीक, उमेश महाजन, सोपान पाटील यांसह राम नवमी व महावीर जयंती मिरवणुकीचे आयोजक, पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील आणि शांतता समिती सदस्य उपस्थित होते.