एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील सर्व इंग्लिश मीडियम शाळा व प्रायव्हेट शाळा बंद करण्यात आल्या असून या काळात शिक्षकांना पुर्ण पगार द्यावा, अशी व्यवस्था करा अन्यथा शाळा सुरु करा, अश्या मागणीचे निवेदन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले आहे.
शाळा बंद केल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. इंग्लिश मीडियम शाळांमधील शिक्षक व सर्वच कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. जर अशा पद्धतीने शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नसल्यामुळे पालक शाळेची फी देण्यास नाकारतात व त्याचा सरळ परिणाम शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. शाळेची फी जमा झाली तरच शाळा व्यवस्थापन शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार करू शकते. अन्यथा त्यांना देखील अडचण येते .
सरकारने शाळा बंद करतांना आमचाही विचार करावा कारण आम्ही देखील भारताचे नागरिक आहोत. आमच्या कडून उदरनिर्वाहाचे साधन हिसकावून घेतले जात आहे. ज्याप्रमाणे शासकीय सेवेत असणाऱ्या शिक्षकांना शाळा बंद काळात पूर्ण पगार दिला जातो, तशी शासनाने आमची देखील व्यवस्था करावी, अन्यथा शाळा सुरू कराव्यात, अशा आशयाचे निषेध निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन देतेवेळी के.डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दीनानाथ पाटील, उज्वल पाटील, तसेच शहरासह तालुक्यातील इंग्लिश मीडियम प्रायव्हेट शाळांचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.