पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ८ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे भारतीय छात्र संसदच्या १४व्या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील ४५० विद्यापीठांमधील सुमारे ८,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील १३६ विद्यार्थ्यांनी भारतीय छात्र संसदचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात सहभाग नोंदविला.
छात्र संसदच्या उद्घाटन समारंभात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले, “आयुष्यभर साधी जीवनशैली आत्मसात करून, वाटचाल करणारे राजकारणी देशात कमी आहेत. सत्ता म्हणजे अहंकार करणे नाही, तर लोकांसाठी कामे करणे आणि समस्यांचे निराकरण करणे हेच खरे कार्य आहे.”
या अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवाकल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभा सदस्य पवन खेरा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, काँग्रेसचे नेते डॉ. कन्हैय्या कुमार, एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहूल कराड यांसारख्या नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या भाग म्हणून ४ सत्रांचे आयोजन केले गेले होते. त्यात प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे होते:
सत्र १: भारतीय राजकारणाची विचारधारा- डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर?, सत्र २: रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार? सत्र ३: भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर- भारतीय युवकांची कोंडी., सत्र ४: एआय आणि सोशल मिडिया- सामर्थ्य की अनपेक्षित संकट?, कार्यक्रमाचे समारोप करतांना मुख्य पाहुण्यांनी भारतीय युवा पिढीला देशाच्या विकासासाठी व सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विविध सत्रांतून विचारांची देवाण-घेवाण केली, ज्यानंतर त्यांचे विचार देशाच्या भविष्यातील मार्गदर्शक ठरू शकतात. युवक-युवतींचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्टिकोन सुधारण्याच्या उद्देशाने भारतीय छात्र संसदचे १४ वे अधिवेशन खूपच यशस्वी ठरले.