पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बंडखोर आमदारांनी आधी राजीनामे देऊन मग स्वत:च्या हिंमतीवर निवडून यावे असे आव्हान शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिले. ते पक्षाच्या पारोळा येथे आयोजीत बैठकीत बोलत होते.
पारोळा येथे जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजीत करण्यात आली. याप्रसंगी संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह जिल्हा प्रमख डॉ.हर्षल माने, माजी शहर प्रमुख अण्णा चौधरी, राजू जावळे, आबा महाजन, सतीश पाटील, एरंडोलचे जगदीश पाटील, संदीप पाटील, नितीन पाटील, पारोळा तालुका सेना प्रमुख प्रा.आर.बी. पाटील, भूषण भोई, सावन शिंपी, डॉ.मनीष पाटील, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संजय सावंत यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चिमणराव पाटील यांना पक्षाने सर्व काही दिले असले तरी त्यांनी पक्ष वाढू दिला नाही. याचमुळे आम्ही आधीच डॉ. हर्षल माने यांच्या रूपाने एक तडफदार युवा जिल्हाप्रमुख दिलेला आहे. आगामी निवडणुकीत चिमणराव पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी आमदारांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, कोविड काळात आम्ही थेट जनतेत जाऊन सेवा केली असली तरी आमदार आणि त्यांचे पुत्र मात्र घरात बसून होते. यांना आता जनतेने घरी पाठविण्याची वेळ झाली असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत रवींद्र पाटील, तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, सुनील पवार, राजू जावळे, देवगाव येथील ग्रामपंचायत सदस्य डॉ.मनीष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, भूषण भोई, सावन शिंपी, अण्णा चौधरी, प्रशांत पाटील यांनी आपण पक्षासोबत असल्याचे सांगत आमदारांवर हल्लाबोल केला.