पारोळा प्रतिनिधी । येथील पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार्या भव्य क्रीडा संकुलाच्या कामाबाबत विरोधक राजकारण करत शहराच्या विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप नगराध्यक्ष करण पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, पारोळा येथे भव्य क्रीडा संकुलाचे काम शहरातील तलाठी कॉलनीला लागून गट क्रमांक २४४/२ (सि.स. नंबर ३४३)मध्ये करण्याचा ठराव सन २०१८मध्ये सर्वानुमते पारीत केला होता. या जागेत भव्य स्टेडियम व पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन केले होते. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत १०.५ कोटी असून वर्कऑर्डर मिळाल्यावर १८ महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित निविदा प्रक्रियेत नमूद केले होते. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१९ रोजी निविदा प्रक्रिया करण्यात आली.
पवार पुढे म्हणाले की, मागील चौदा महिन्यात या संपूर्ण जागेचे सपाटीकरण करुन संरक्षक भिंत बांधून तसेच व्यापारी संकुलाचे काम ८० टक्के करुन क्रीडा संकुलाच्या कामास गती देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना माजी नगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे प्रमुख गोविंद शिरोळे यांनी २९ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकार्यांकडे या कामाबाबत तक्रारी अर्ज करुन शहराच्या विकास कामास खीळ घालण्याचा प्रयत्न केला. शहर विकासाच्या दृष्टीने या कामाची भव्यता पाहून विरोधकांना ही पोटदुखी ठरत असल्याचा आरोप करण पवार यांनी केला.
दरम्यान, विरोधकांच्या षडयंत्रामुळे गतीने सुरु असलेल्या या कामास खीळ बसली आहे. विकास कामात राजकारण करणार्यांना जनतेने ओळखावे, असे नमूद करुन हे काम लवकर सुरु होईल, असा आशावाद करण पवार यांनी व्यक्त केला. तर या क्रीडा संकुलात क्रिकेट ग्राऊंड, जाँगींग ट्रॅक, धावणे, लांब उडी, खो-खो, कबड्डी ग्राऊंड, बॉस्केट बॉल, व्हॉलिबॉल, लाँग टेनिस तर इनडोअर हॉलमध्ये कॅरमबोर्ड, टेबलटेनिस, बँडमिंटन, बुद्धीबळ, मॅट कुस्ती, योगा हॉल व स्विमिंग पुलाचे काम करण्यात येत असल्याची माहिती करण पवार यांनी दिली.