चाळीसगाव पंचायत समिती उपसभापती सुनील पाटील अपात्र

चाळीसगाव प्रतिनिधी । ऐन निवडीच्या वेळीस विरोधी गटाला जाऊन मिळालेले येथील पंचायत समितीचे सभापती सुनील पाटील यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांसाठी २ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्यात सुनील पाटील हे ऐन वेळी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती. दरम्यान, निवडणुकीसाठी भाजपने निवडणुकीच्या १५ दिवसांपूर्वी मीटिंगचा अजेंडा काढला होता. निवडीवेळी व्हीपही बजावला होता. बैठकीतही सदस्य सुनील पाटील हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी व्हीप झुगारला असा दावा करत भाजपचे गटनेते व सभापती पदाचे पराभूत उमेदवार संजय पाटील यांनी या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली. अ‍ॅड. धनंजय ठोके व अ‍ॅड. विश्‍वास भोसले यांनी संजय पाटील यांच्या वतीने काम पाहिले.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे वेळोवेळी सुनावणी झाली. मात्र उपसभापती सुनील पाटील एकदाही उपस्थित नव्हते. या सुनावणीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना मंगळवारी २४ रोजी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे उपसभापती सुनील पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाबद्दल अद्यापही अधिकृत पत्र आले नाही. त्यामुळे भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तसा निर्णय झाला असेल तर या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहिती दिली.

Protected Content