पारोळा प्रतिनिधी । नगराध्यक्ष करण पवार यांनी सुचविल्यानुसार पारोळा येथील बायपासबाबत बदल करण्यात आले आहेत. तसेच पुनगावलगत महामार्गावर अंडरपास करण्यात येणार असून यामुळे शेतकर्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
पारोळा परिसरातील महामार्गाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर, खासदार पाटील यांनी नगराध्यक्ष करण पवार यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, नगराध्यक्ष पवार यांनी पारोळालगत जाणार्या बायपासच्या कामांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार काही बदल सुचवले होते. त्यानुसार कामे केली जात आहेत. यात येथील अमळनेर रस्त्यालगत असलेल्या पुनगावलगत महामार्गावर बोगदा (अंडरपास) नसल्यामुळे परिसरातील शेतकर्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. शेतकर्यांची गैरसोय दूर करण्यासाठी या परिसरात स्वतंत्र बोगदा तयार करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.के.सिन्हा यांनी प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच शेतकर्यांची समस्या सुटेल, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, धरणगाव रस्त्यालगत अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या प्रार्थनास्थळी व इदगाहकडे जाण्यासाठीही अंडरपास गरजेचा असल्याने आराखड्यात तरतूद करण्याच्या सूचना दिली आहे. तर, दळवेल येथे ओव्हरब्रिज रद्द करून १० फुटांचे दोन अंडरपास करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी सिन्हा यांना दिल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष करण पवार, नगरसेवक पी.जी.पाटील, संजय पाटील, गौरव बडगुजर आदी उपस्थित होते.