पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज दुपारी आलेल्या वादळी पावसाप्रसंगी वीज कोसळल्याने शेतात काम करणार्या सालदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज दुपारी तालुक्यात वादळी वार्यांसह पाऊस झाला. यात दगडी सबगव्हाण शिवारातील शरद गोपीचंद पाटील यांच्या शेतात काम करणार्या सुनील आबाजी भील (वय २६, रा. दगडी सबगव्हाण, तालुका पारोळा) हे शेतात काम करत असतांना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते बेशुध्द झाले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.
याची माहिती मिळताच शरद पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना रूग्णालयात दाखल केले. येथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. वीज कोसळून सुनील आबाजी भील या तरूणाचा मृत्यू झाल्याने दगडी सबगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे. या शेतकर्याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.