ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव व बुलढाण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात जनहितार्थ उपक्रमांचा समावेश आहे. तर, सायंकाळी नेहमीप्रमाणे पाळधी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून यात ते नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सोमवार दिनांक ५ जून रोजी वाढदिवस असून यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ना. गुलाबराव पाटील हे सकाळी सात वाजेपासून पाळधी ग्रामपंचायतीच्या बाजूला शुभेच्छा स्वीकारणार आहेत. याच्याच बाजूला सकाळी नऊ वाजता स्वच्छतेचा जागर या जनजागृतीपर रथयात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, कृषी अवजारे तसेच बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबत श्रीराम मंदिर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या कडाक्याचे उन पडत असल्यामुळे दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत कुणीही आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच केले आहे. या अनुषंगाने दुपारी कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले नाहीत. पाच वाजता ना. पाटील पुन्हा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणार आहेत. तर सायंकाळी ७.३० वाजता पाळधी येथील ग्रामपंचायत जवळच्या भव्य मैदानावर सभा होणार आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी धरणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आपण आपल्यावर होत असलेल्या सर्व आरोपांना वाढदिवसाच्या सभेत उत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content