परिवर्तन’चा नाट्य महोत्सव पुण्यात होणार !

parivartan logo

जळगाव, प्रतिनिधी | येथील ‘परिवर्तन’ या संस्थेचा नाट्य व संगीत कलाकृतींचा तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पुणे येथील ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ व ‘नाटकघर’, पुणे यांनी ज्योत्स्ना भोळे सभागृहात दिनांक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे.

 

‘परिवर्तन’ या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांनी जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. ‘परिवर्तन’ निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमित आयोजित केले जात आहेत. महोत्सव संस्कृती खान्देशामध्ये निर्माण करणाऱ्या ‘परिवर्तन’चा महोत्सव आता पुण्यातही होणार आहे. खान्देशातील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे, हे पहिल्यांदा घडत आहे. खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे.

पुण्यात तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ‘अरे संसार संसार’ हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. लेवागण बोली मधील बहिणाबाईची कविता खान्देशमधील कलावंत आपल्या बोलीमधुन उलगडणार आहेत. ही संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे. या कार्यक्रमात मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, भूषण गुरव, योगेश पाटिल, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर आणी शंभू पाटील हे कलावंत सहभागी असणार आहेत. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी आहेत.

या प्रयोगनंतर ‘नली’ या हर्षल पाटील अभिनीत एकल नाट्याचा प्रयोग होणार आहे. लेखक श्रीकांत देशमुख, नाट्यरूपांतर शंभू पाटील, दिग्दर्शन योगेश पाटील यांचे आहे. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचाय… पण कसा ?’ हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटिल, विजय जैन सादर करणार आहेत. त्याचे निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी आहेत.

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ‘अमृता, साहिर, इमरोज’ हे दिर्घनाट्य होणार आहेत. संकल्पना राहुल निंबालकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील हे कलावंत याचे सादरीकरण करतील. निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे आहेत. या महोत्सवाला पुणे येथील अतुल पेठे, शुभांगी दामले, गोपाळ नेवे, बाबूराव भोर, शिवाजी सरोदे, यांचे सहकार्य लाभत आहे. ‘गांधी नाकारायचाय…पण कसा ?’ या प्रयोगाला राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंनिस, सा. साधना, हरिजन सेवक संघ या संस्थांचे सहकार्य लाभत आहे. या महोत्सवाचा पुण्यातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतुल पेठे व शुभांगी दामले यांनी केले आहे.

Protected Content