रेल्वेलाईनजवळ हरीविठ्ठल नगरातील तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या गोपाल राजू भोई (वय-३२) या तरूणाचा वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, हरिविठ्ठल नगर भागात गोपाल राजू भोई हा युवक आपले दोन भाऊ व आईसमवेत वास्तव्यास होता. तसेच ठेकेदारीचा व्यवसाय करत होता. बुधवारी २४ जानेवारी रोजी रात्री जेवण करून घराबाहेर निघाला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोपालचा मृतदेह सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनलगत आढळून आला. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी तालुका पोलीसांनी दिल्यानंतर, आधारकार्डव्दारे गोपालची ओळख पटविण्यात आली. याच ठिकाणी गोपाली दुचाकी देखील आढळून आली. जळगाव तालुका पोलिसांनी पंचनामा करून गोपालचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणण्यात आला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला. गोपालच्या मित्रांकडून घात-पाताचा संशय उपस्थित करण्यात आला. दरम्यान, प्राथमिक तपास तालुका पोलीस स्टेशनचे अनिल फेगडे व अनिल मोरे यांनी केला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content