पंकजा मुंडे यांचे भाजपात खच्चीकरण : प्रकाश शेंडगे यांचा दावा

prakash shendge

मुंबई, वृत्तसंस्था | भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय वातावरणात ढवळून निघाले असताना पूर्वाश्रमीचे भाजपाचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांचे भाजपात खच्चीकरण केले जात असल्याचा दावा केला आहे.

 

परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे निराश झाल्या होत्या. त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाही. अशातच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. खुद्द पंकजा मुंडे यांनीही फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले होते, त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

त्यानंतर माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपानं कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकार पंकजा मुंडे यांच्याबाबत केला जात आहे. ओबीसी असल्याने त्यांचेही खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा,” असा सल्ला शेंडगे यांनी दिला आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या मनात काय सुरू आहे, त्यांची काय भूमिका आहे. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी सगळ्यांचे लक्ष गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे लागले आहे.

Protected Content