चाळीसगाव प्रतिनिधी । मागील पावसाळ्यातही तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण वर्षे दुष्काळाच्या सावटाखाली गेले. काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व पाण्याचे योग्य नियोजन केले. काही केळी बागांची लागवड ही जामडी हातले जावळे भागात करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, जून महिना जवळपास संपण्यात आला आहे. त्यात पावसाचा थेंबही नसून, तालुक्यातील सर्व विहिरी, नदी-नाले, लघु-पाटबंधारे कोरडे ठाक झाल्यामुळे केळी बागांसाठी बिलकुल पाणी उपलब्ध होत नाही आहे. या केळीबागांची पाण्याअभावी जागेवरच पडून वाळायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, शेत शिवारात पाणी नसल्याने मुक्या जनावरांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वणवण होत आहे. या भागात महिन्यातून एकदा नळाला पाणी येते. तेव्हा जनावरांची काय अवस्था असेल याचे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. अशाच परिस्थितीमध्ये जामडी येथील भावनिक शेतकरी दीपक राजपूत यांनी आपल्या शेतातील वाया जाणारी केळी बाग जनावरांना चारा म्हणून वापरत आहे. तसेच, इतर शेतकऱ्यांना आवाहन करुन केळीचे झाडे हे जनावरांची भुक भागवण्यासाठी घेऊन जावे असे सांगितले आहे. राजपूत याच्याजवळ असलेली 18 एकर केळी बाग मध्ये शेतकरी स्वतःहून केळीचे झाडे तोडून ट्रॅक्टर व बैलगाडी मिळेल त्या साधनाने हा चारा घेऊन जात असून आपल्या जनावरांची भूक भागवीत आहेत.
राजपूत म्हणाले की, केळी तर गेली, पण जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे. अशा उदारतेने मुक्या प्राण्यांसाठी शेतात पाण्याचे कुंडे पाण्याने भरून येणाऱ्या-जाणाऱ्या जनावरांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे. या परिसरातील गुरेढोरे तहानेच्या व्याकुळतेने यांच्या शेताकडे तहान भागवण्यासाठी धाव घेत आहे. यांच्या या उपक्रमाचे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होऊन लोक त्यांचे आभार मानत आहे. शेवटी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. हे राजपूत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आपलं तर जळाले मग निदान दुसर्याची तरी तहान भूक भागवूया ही प्रामाणिक भावना राजपूत यांनी जोपासली.