यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने तालुक्यातील ग्रामीण पातळीवरील विविध विकास कामांचा खोळंबा होत आहे. प्रशासकीय कामकाजावर नागरीकांमध्ये नाराजीचे सूर निघत असून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील यासंदर्भात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या समोर हा प्रश्न मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
यावल पंचायत समितीला मागील साधारण एक वर्षापासून गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांची कळवण जिल्हा नाशिक येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांच्या संदर्भात, सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या व अडचणींकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याची अनेक नागरीकांची ओरड आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यावल तालुका वगळता जिल्ह्यात चार ते पाच पंचायत समित्यांवर नव्याने गटविकास अधिकारी देण्यात आले असून मग यावल पंचायत समितीला कायम स्वरूपी गटविकास अधिकारी का मिळत नाही ? असा प्रश्न तालुक्यात सर्वत्र चर्चला जात आहे.
आपण जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून यावल तालुक्याच्या विकास कामांना चालना देण्यासाठी कायम स्वरूपी गटविकास अधिकारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तुषार पाटील यांनी सांगीतले.