टायर चोरी करणार्‍याचे रेखाचित्र जाहीर; ५१ हजारांचे पारितोषीक

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथील गोदामातून तब्बल २३ लाख रूपयांचे टायर चोरी केल्या प्रकरणी आरोपीचे स्केच तयार करण्यात आले असून त्याला शोधणार्‍याला ५१ हजा रूपयांचे पारितोषीक जाहीर करण्यात आले आहे.

पाळधी येथे लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीच्या पलोड डिस्ट्रिब्युटर्सच्या गोदामात तब्बल २३ लाख रूपयांच्या टायर्सची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ९ सप्टेबरच्या मध्यरात्री १ वाजता दोन ट्रक घेऊन चोरटे गोडाऊनच्या मागच्या बाजूस आले. पाच-सहा चोरटे खिडकीची काच फोडून, लोखंडी अँगल वाकवून आत शिरले. त्यांनी गोदामातून टायर, रेडीयल व ११ हजारांची रोकड असा २३ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. १० सप्टेंबरला सकाळी ही चोरी उघड झाली असून धरणगाव येथे गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या संदर्भात यातील एका चोरट्याने पाणी पिण्यासाठी चेहर्‍यावरील मास्क बाजूला केले. त्यामुळे केवळ त्याचा एकट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला होता. यावरून संबंधीत चोरीच्या फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. यानंतर या चोराचे रेखाचित्र अर्थात स्केच जारी करण्यात आले असून या चोरट्याची माहिती देणार्‍यास ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी हे स्केच तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. जनतेने हा चोरटा कुठे आढळल्यास याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content