जळगाव प्रतिनिधी । मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह आज सकाळी पाळधीजवळील चिमनीभट्टा परिसरातील पाण्याच्या खदानीत तरंगतांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जयेश दत्तात्रय पाटील (वय-१८, रा़ नशिराबाद) व अनिता (नाव बदललेले) रा. पाळधी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, काहींनी घातपाताचा तर काहींनी दुचाकी घसरून दोघे पाण्याच्या डबक्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी पाळधी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे जयेश पाटील हा कुटूंबीयांसह राहत होतो. तो पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. तर पाळधी येथील प्रियंका ही दहावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, बुधवारी जयेश हा कुटूंबीयांना काही न सांगता घरातून निघून गेला. मुलगा घरी परतला नाही. म्हणून कुटूंबीय व मित्र मंडळी त्याचा शोध घेत होते. दुसरीकडे बुधवारी अनिता ही सुध्दा सकाळी पाळधी गावातीलच एका क्लासला गेलेली होती. त्यानंतर ती देखील ११ वाजता तेथून निघून गेली. त्यामुळे ती सुध्दा घरी न परतल्यामुळे तिचाही कुटूंबीय शोध घेत होते. गुरूवारी मुलीच्या कुटूंबीयांनी पाळधी पोलीस स्टेशन गाठत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. यावरून हे दोघंजण प्रेमी युगल असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाळधी गावाच्या एक ते दीड किलो मीटर अंतरावर चांदसर रस्त्यावरील एका खदानीतील पाण्यात काही ग्रामस्थांना तरूण-तरूणीचे मृतदेह तरंगताना आढळून आले. याबाबत त्यांनी त्वरित पाळधी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महिला सहाय्यक फौजदार निलिमा हिवराळे, अरूण निकुंभ, सुमित पाटील, गजानन महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले.
डबक्यात आढळली दुचाकी
पोलिसांना तरूण-तरूणीच्या मृतदेहाजवळ दुचाकी सुध्दा पाण्यात बुडालेली आढळून आली. दुचाकीच्या क्रमांकावरून जयेश पाटील याची ओळख पटली. दरम्यान, नशिराबाद येथून पाळधी येथे (एमएच १९ डीएच ६८१६) क्रमांकाच्या मोपेड दुचाकीने तो आला होता. दुसरीकडे मुलीचीही ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्वरित अनिता हिच्या घरी माहिती दिली. यावेळी दोघांच्या कुटूंबीयांनी व मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर दोघांचे मृतदेह हे जिल्हारूग्णालयात शवविच्छेदनासाठी वाहनातून नेण्यात आले. जयेश आणि अनिता यांचे प्रेमसंबंध होते. अधून-मधून जयेश हा अनिता हिला भेटण्यासाठी पाळधी येथे येत होता. दरम्यान, शुक्रवारी अचानक खदानीत मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांकडून घातपाताच संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे इन-कॅमेरा शवविच्छेदन व्हावे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.