पाळधी, ता. धरणगाव वि.प्र. । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम सुरू झाली असून जनतेने एकजुटीने याला सहकार्य करून कोरोनाला हरविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज पाळधी येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेस प्रारंभ केल्यानंतर बोलत होते.
पाळधी येथे आजपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ या माध्यमातून झाला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील, पाळधी खुर्द व बुद्रुक गावचे सरपंच आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कोरोनाचे संकट वाढत असताना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाशी दोन हात करण्याच्या प्रक्रियेत शासन आता सर्वसामान्यांना सहभागी करुन घेणार आहे. यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. या जनजागृती मोहिमेत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचार्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.
दरम्यान, आज सकाळी पाळधी येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पाळधीत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनाचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यासाठी लोक सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. प्रशासनाच्या मदतीने आता जिल्ह्यातील कोरोनावर मात करणार्या रूग्णांची संख्या ही आटोक्यात आली असून आपला रिकव्हरीचा रेट हा देखील चांगला आहे. आता आपल्याला यापुढे अतिशय सतर्कतेने वागावे लागणार असून यासाठी लोकांचा सहभागी हा अतिशय महत्वाचा आहे. यामुळे सर्वांनी एकजुटीने याला सहकार्य करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.