जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याच्या भावनेला कलात्मक रूप देत, जळगावच्या युवा कलाकार पालवी जैन हिने साकारलेले “स्वदेशी खरेदी करा” हे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. “फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स” (FAME) तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत तिच्या अभिनव कल्पनेला आणि सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
या स्पर्धेत जाहिरात संस्था, कला महाविद्यालये आणि व्यावसायिक कलाकारांकडून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित आर्टवर्क मागविण्यात आले होते. देशातील व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि स्वदेशी उत्पादने वापरण्याचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या पार्श्वभूमीवर पालवी जैनच्या आर्टवर्कने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तिच्या सादर केलेल्या कलाकृतीत परदेशी ‘प्रादा’ पादत्राणांसोबत भारतीय ‘कोल्हापुरी चप्पल’ अभिमानाने उभी दाखवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ‘प्रादा’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचे डिझाईन कॉपी केल्याचा वाद सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता, त्याच घटनेचा संदर्भ घेऊन पालवीने सर्जनशील संदेश दिला “स्वदेशी वस्तूंवरच आपला अभिमान”.
पालवीला या विजेतेपदासाठी अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे बक्षीस प्रदान करण्यात आले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्रख्यात चित्रकार विकास मल्हारा, ‘परिवर्तन’ संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांच्यासह कला, जाहिरात आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पालवीचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, पालवीचे वडील विजय जैन, जे जैन इरिगेशनच्या कला विभागात कार्यरत आहेत, यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पालवी ही नीलिमा आणि विजय जैन यांची कन्या असून, तिच्या या यशाने जळगाव शहरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.



