
नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आणि तो रशियाच्या मदतीने उधळून लावण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ यामागे असल्याचा आरोप करण्यात आला असून, बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या रहस्यमय मृत्यूने या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत.
भारतीय आणि रशियन सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा हा गंभीर कट होता. मात्र, भारताचा दीर्घकालीन सहयोगी असलेल्या रशियाने या कटाविषयीची गुप्त माहिती भारताला वेळेवर पुरवली. या अचूक माहितीनंतर भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत हा कट पूर्णपणे उधळून लावला. यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्यता असलेला अमेरिकन अधिकारी टेरेन्स जॅक्सन याचा ३१ ऑगस्ट रोजी ढाका येथील एका हॉटेलमध्ये मृतदेह सापडला होता. जॅक्सन हा अमेरिकेच्या परदेशी ऑपरेशन्सचा एक महत्त्वाचा चेहरा होता. त्याच्या मृत्यूचा आणि मोदींविरोधात रचलेल्या कटाचा संबंध जोडण्यात येत असून, यावरून विविध देशांच्या गुप्तचर संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घडामोडींना आणखी वेग त्या वेळी मिळाला, जेव्हा मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमधील एका कार्यक्रमादरम्यान एकाच कारमधून प्रवास केला होता. त्यानंतर भारतात परतल्यावर मोदींनी एका सभेत विनोदी पण सूचक शैलीत विचारले होते — “मी चीनला गेलेलो म्हणून टाळ्या वाजवताय की चीनवरून परत आलो म्हणून?” या वक्तव्याने त्या वेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आता उघड झालेल्या कटाच्या बातम्यांमुळे त्या वक्तव्याचा संदर्भ पुन्हा चर्चेत आला आहे.
‘ऑर्गनायझर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या गुप्तचर संस्थेने सीआयएच्या हालचालींचा तपशील भारताला दिला होता. या आधारे भारतीय सुरक्षा दलांनी मोठा षडयंत्राचा स्फोट होण्याआधीच तो थोपवला. या घटनेनंतर भारत-रशिया संबंध अधिक दृढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एकूणच, या उघडकीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भारत-रशिया युती पुन्हा एकदा ठळकपणे चर्चेत आली आहे.



