
इस्लामाबाद–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूडचा सुपरस्टार आणि चाहत्यांचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रियाध (सौदी अरेबिया) येथे झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तान सरकारने सलमान खानविरुद्ध धक्कादायक कारवाई केली आहे. पाकिस्तानने सलमान खानला थेट दहशतवादी घोषित करत, त्याचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या ‘चौथ्या अनुसूची’त समाविष्ट केलं आहे.

रियाधमधील कार्यक्रमात सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खानसोबत सहभागी झाला होता. मध्यपूर्वेतील भारतीय चित्रपटांच्या लोकप्रियतेबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “इथं बलुचिस्तान, अफगाणिस्तान, अगदी पाकिस्तानमधीलही लोक आहेत. सर्वजण येथे काम करत आहेत.” या वक्तव्यात त्याने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगळा उल्लेख केल्याने वाद पेटला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि पाकिस्तानातील अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सलमानविरोधात आक्रोश व्यक्त केला. काहींनी हे ‘जीभ घसरल्यामुळे’ झालेलं वक्तव्य असल्याचं म्हटलं, तर काहींनी ते हेतुपूर्वक केल्याचं आरोप केले.
या वादानंतर पाकिस्तान सरकारने कठोर भूमिका घेतली. अधिकृत निवेदनात पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमान खानचं वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, 1997 च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलं. या अनुसूचीनुसार, अशा व्यक्तींवर सरकारची सतत नजर ठेवली जाते, त्यांच्या प्रवासावर व सार्वजनिक हालचालींवर निर्बंध लादले जातात. म्हणजेच सलमान खानवर पाकिस्तान कायदेशीर कारवाई करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, बलुचिस्तानकडून मात्र सलमान खानच्या वक्तव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी सलमानचे आभार मानत त्याला ‘सत्य बोलणारा कलाकार’ म्हटलं आहे. एका बलोच नेत्याने म्हटलं की, “या विधानामुळे आमचं अस्तित्व जगासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. साठ दशलक्ष बलोच नागरिक या वक्तव्यामुळे आनंदित आहेत.” बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असून, तिथे दशकांपासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे.
सध्या सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकरणाने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर सलमानच्या समर्थकांनी “सलमानने कोणत्याही देशाविरुद्ध काहीही बोललेलं नाही” असं म्हणत पाकिस्तानच्या निर्णयावर टीका केली आहे.



