
पाचोरा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी ‘मातृ पितृ दिना’च्या निमित्ताने पुज्य संत श्री आसाराम बापु यांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आलेली ‘भक्ती जागृती प्रचार यात्रा’ शनिवारी पाचोऱ्यात दाखल झाली. सुरत येथील साधक परिवार लिम्बायत परिवाराच्या वतीने आयोजित या यात्रेत मातृ-पितृ भक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. “आई-वडिलांना जीव लावा, त्यांची सेवा करा आणि त्यांचे पालनपोषण हेच खरे धर्मकर्म आहे,” हा संदेश या यात्रेमार्फत देण्यात आला.
सदर प्रचार यात्रा २३ ऑक्टोबर रोजी नवापूर येथून प्रारंभ झाली होती. सात दिवस चालणारी ही यात्रा विविध शहरांमधून प्रवास करत २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरात दाखल झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. या ठिकाणी महिला, पुरुष, तसेच युवक-युवतींनी पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या औचित्याने पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पुज्य संत आसाराम बापु यांची आरती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, वंदना भरत पाटील तसेच अनेक सेवेकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यात्रेत सहभागी भक्तांनी “मातृ-पितृ सेवाच खरी भक्ती” असा नारा देत शहरातून प्रचार फेरी काढली.
या यात्रेचा पुढील प्रवास पाचोऱ्याहून शेंदुर्णी, सोयगाव, जामनेर, भुसावळ, जळगाव मार्गे धुळे येथे २८ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. प्रत्येक ठिकाणी पुज्य संत आसाराम बापु यांची आरती केली जात असून यात्रेवर फुलांचा वर्षाव आणि भक्तीगीतांचा गजर सुरू आहे. या यात्रेमुळे संपूर्ण भागात मातृ-पितृ भक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचत आहे.



