पहुर तालुका जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या हिवरी शिवारात बिबट्याने दोन माकडे फस्त केल्याचे आढळून आल्याने भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.
येथून जवळच असलेल्या हिवरी परिसरात शेतात राहणारे एका नागरिकाला बिबट्या दिसला. यानंतर हिवरी रोड वरून प्रवास करणार्या दोन इसमांना सुद्धा बिबट्या आढळला त्यामुळे हिवरी येथील गावकर्यांनी वन अधिकार्यांना पाचारण केले. वनपरिक्षेत्र अधिकारी पंडित सर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल जामनेर प्रशांत पाटील तसेच वनरक्षक अशोक ठोंबरे, वन कर्मचारी जीवन पाटील, विजय चव्हाण सुनील पालवे ,के डी महाले यांनी हिवरी शिवारात धाव घेतली.
दरम्यान, वन खात्याचे पथक शोध कार्य करीत असताना त्यांना हिवरी शिवारातील रघुनाथ जयराम पाटील यांच्या शेतातील केळीमध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले. त्यावरून बिबट्या या शिवारामध्ये वावरतो आहे याची खात्री त्यांना झाली. यातच या भागात दोन माकडांचे अवशेष देखील दिसून आले. बिबट्याने या दोन माकडांना फस्त केल्याची घटना या ठिकाणच्या नागरिकांनी वन अधिकार्यांना बोलून दाखवली.
दरम्यान, बिबट्या हा एका ठिकाणी थांबत नसल्याने तो या ठिकाणी वास्तव्यास राहील असे नाही तर तो पुढे निघून गेला असल्याची शक्यता व्यक्त केली त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता सतर्कता बाळगावी. शेतामध्ये काम करीत असताना फटाक्यांचे आवाज काढावेत, रात्रीला झोपताना शेकोटी करून झोपावे अशा सूचना वन खात्याच्या पथकाने दिल्या. यावेळी वनपाल व त्यांच्या टीम सोबत परिसरातील शेतकरी नितीन देशमुख ,राहुल पाटील ,नवल देशमुख ,रमेश पाटील ,प्रवीण पाटील ,मयूर पाटील, उमेश पाटील ,तसेच पत्रकार जयंत जोशी उपस्थित होते.