भुसावळात रंगला ‘ पाडवा पहाट’ कार्यक्रम …!

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी…! दोन वर्ष कोरोनामुळे ‘ पाडवा पहाट ’ कार्यक्रमाला खंड पडल्यानंतर आता निर्विघ्नपणे पाडवा पहाट कार्यक्रमाचे भुसावळ शहरातील एन. के.नारखेडे शाळेसमोरील सांस्कृतिक मैदान,सहकारनगर येथे आयोजन करण्यात आले होते.

आज रसिक श्रोतेही पाडवा पहाट कार्यक्रमाला हजर असणे हे मानाचे समजतात. पहाटे लवकर उठून स्नान करून अस्सल पारंपारिक मराठी पेहराव परिधान करून रसिक मंडळीची या ” पाडवा पहाट ” कार्यक्रमाला हजेरी होती, या सगळ्यामुळे एकूणच वातावरणात एक औरच चैतन्य भरलं गेलं. कलाकार मंडळींनीही तितक्याच उत्साहाने कार्यक्रम सादर केला. संपूर्णपणे मराठी ‘फील’ देणारी, भारावलेली अशी ही पहाट भुसावळकारांच्या आयुष्यात अविस्मरणीय राहील…! श्रोत्यांसाठी ही दिवाळी पहाट…पाडवा पहाट उत्साहाची असते, आनंदाची असते, तशीच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठीही उत्साहाची आणि त्याहीपेक्षा कसोटीची असते. रोटरी क्लब भुसावळ रेलसिटी, रिदयम हॉस्पिटल,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आणि सुनहरे पलतर्फे या देखण्या ” पाडवा पहाट ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..रसिक श्रोते स्वर रसात न्हाऊन निघाले.विविध गाजलेली भावगीते,भक्तिगीते यावेळी सादर झालीत. सुपरिचित गायिका लक्ष्मी नाटेकर,विकास जंजाळे ,संजय सुरवाडे ,खाकी वर्दीतील कलावंत संदीप बडगे ,जेष्ठ गायक गोपाळ गोस्वामी यांनी गायलेल्या गाण्यांमुळे ही दिवाळी अधिकच चैतन्यमय होऊन गेली आणि चांगलाच रंग भरला गेला..आणि प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

प्रारंभी रोटरी क्लब ऑफ रेलसिटीचे प्रोजेक्ट चेअरमन संदीप जोशी,को-चेअरमन जीवन चौधरी, अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर,सचिव सन्मित पोतदार ,डॉ.शंतनू साहू ,नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी श्री गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ,दीपप्रज्वलन करून पूजन केले.
कलावंत दीपक नाटेकर, जळगाव जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे सचिव ,सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार तुषार वाघुळदे, प्रसिध्द गायिका लक्ष्मी नाटेकर, विकास जंजाळे, संजय सुरवाडे ,परवेज शेख,गोपाळ गोस्वामी,विवेक शिवरामे,फिरोज पठाण,संजय पटेल, मुन्ना साऊंडचे मंसूर भाई, श्री.बडगे अविनाश ठाकूर ,जय सोनवणे, दिनेश ठाकूर आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या देखण्या आणि अनोख्या कार्यक्रमाला भुसावळकर रसिकांनी चांगलीच दाद दिली.उपस्थितांमध्ये मनोज सोनार,सामाजिक कार्यकर्ते सोनू मांडे,सुनील पाटील,संदीप सुरवाडे,अंजली जोशी,अनघा कुळकर्णी, नेहा वाघुळदे आदींची हजेरी होती. कार्यक्रमाचे बहारदार, खुमासदार आणि विशेष शैलीत कलावंत तुषार वाघुळदे यांनी सूत्रसंचालन केले. आभार संदीप जोशी यांनी मानले.

Protected Content