यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध सेवा ठप्प झाल्या असून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही, त्यामुळे हे कर्मचारी वारंवार संप पुकारत असतात. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्या पगाराचे योग्य नियोजन केले जात नसल्याने ही समस्या वारंवार उद्भवत आहे. विशेष म्हणजे संप सुरू असतानाही काही कर्मचारी वसुलीचे काम सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
गावाची सुरक्षा धोक्यात
ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वित्त आयोगाच्या निधीतून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. यामुळे गावात चोरी, गैरप्रकार आणि इतर गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने गावाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांचा संताप; प्रशासनास इशारा
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, त्वरित उपाययोजना करून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभारामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.