पाडळसरे धरणास भरीव निधी देणार; जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटलांचे आश्वासन

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने गेल्या वर्षी पडळसरे धरणासाठी १३५ कोटी रुपयांचा मोठा निधी दिला असून आता पुन्हा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी येत्या बजेट अधिवेशनात मागील वर्षीपेक्षा जादा भरीव निधी देण्याचे आश्वासन आमदारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास दिल्याने कामाच्या प्रगतीच्या दृष्टीने पाडळसरे धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.

पाडळसरे धरण म्हणजे तालुक्यासाठी जलसंजीवनी असल्याने आ.अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच धरण कामास गती देण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत,त्याचाच परिणाम म्हणून कामाच्या दृष्टीने अनेक तांत्रिक अडचणी दूर होऊन धरणाच्या डिझाईन मध्ये बदल होऊन मंजुरी मिळाली आहे,याशिवाय मागील वर्षी 135 कोटी भरीव निधी दिल्याने कामास गती मिळाली आहे,यावर्षी देखील धरणासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आ.अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांच्याकडे सतत तगादा लावला होता,अखेर मंत्र्यांच्या तोंडून ठोस आश्वासन मिळावे यासाठी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचे मोठे शिष्टमंडळ सोबत घेऊन मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन काहीही करा पण आम्हाला धरणासाठी जादा निधी द्या असा आग्रहच धरला.

यावर ना जयंत पाटील यांनी शिष्टमंडळास सांगितले की, पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे स्वप्न आ.अनिल पाटील यांचे असल्याने ते समोर आले की आम्हालाही धरणच दिसते, त्यांनी नेहमीच या शासनाकडे त्यासाठी आग्रह धरला आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ती करणे हे शासनाचे देखील ध्येय आहे त्यामुळे काळजी करू नका येत्या बजेटमध्ये आम्ही मागील वर्षी पेक्षा जादा निधी देणार आहोत. याशिवाय धरणाच्या पूर्ततेसाठी जे जे करावे लागेल ते हे शासन केल्याशिवाय राहणार नाही, अशी हमीची ग्वाही ना.जयंत पाटील यांनी दिली.

तसेच आमदारांनी यावेळी धरणाचे डिझाईन बदलल्याने त्याचे आदीक्यही वाढले मात्र या आदीक्यचा प्रस्तावास मान्यता नसल्याने धरणाच्या पिअर्स चे काम सुरू होत नाही, अशी कल्पना मांडली यावर मंत्रांनी  तात्काळ तापी पाटबंधारे विभागाचे प्रमुख व कार्यकारी संचालकाना तेथूनच फोन करून आदीक्याचा प्रस्ताव 15 दिवसांच्या आत मंत्रालयीन स्तरावर पाठवून त्याची मान्यता घ्यावी. जेणेकरून पिअर्स चे काम लागलीच सुरू होऊ शकेल. तसेच धरणाच्या दृष्टीने जे काही तांत्रिक दोष असतील ते येत्या 15 दिवसाच्या आत तातडीची बैठक घेऊन दूर करावेत अश्या स्पष्ट सुचना करून शिष्टमंडळास दिलासा दिला. मंत्र्यांची अशी सकारात्मक भूमिका आणि आमदारांनी केलेले यशस्वी प्रयत्न पाहून शिष्टमंडळातील सदस्यांनी जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानत आमदारांचे विशेष कौतुक केले.

मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधीची मागणी

अमळनेर तालुक्यातील मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी जेणेकरून या परिसरातील गावांना जलप्रवाह उपलब्ध होऊन ग्रामिण जनतेला याचा विशेष लाभ होईल अशी मागणी आ.अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली या मागणीला देखील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या बजेट अधिवेशनात यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, माजी संचालक बाजार समिती अमळनेर अनिल शिसोदे तसेच पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,प्रताप साळी,रणजित शिंदे,प्रा सुनिल पाटील,नरेंद्र पाटील,अजयसिंग पाटील,हेमंत भांडारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आता आमच्या आशा पल्लवित झाल्या-समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावना

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आतापर्यंत धारणासाठी अनेक आंदोलने आम्ही केली,मुंबईच्या अनेक फेऱ्या मारल्या मात्र आतापर्यंत भाजप सरकार मधील कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला असा प्रतिसाद दिला नव्हता,त्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री जळगाव जिल्ह्याचे असतानाही त्यांनीही लक्ष दिले नाही,मात्र या भेटीत जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी आपला बराचसा वेळ आमच्यासाठी देऊन परिपुर्ण संवाद साधला, एवढेच नाही तर तुमचे आमदार दिसले म्हणजे आम्हाला धरण दिसते असे बोलूंन धरणाबाबत मोठी आस्था दाखवल्याने खरोखरच आमच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत,जलसंपदा मंत्र्यांची सकारात्मक भूमिका आणि आपल्या आमदारांचे प्रयत्न दोन्ही कौतुकास्पद आहेत,आणि हे सरकार आणि या सरकार मधील मंत्री यांच्यावर आमचा विश्वास आता वाढला असल्याची भावना सर्व कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे व्यक्त केली.

 

Protected Content