हृदयद्रावक : आई-वडिलांना पिण्यासाठी विहीरीतुन पाणी काढतांना तरूणाचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली शिवारात आपल्या आई-वडिलांना पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढतांना पाय घसरून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पाचोरा – जामनेर रोड वरील आर्वे फाट्या नजीक अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे येथील डॉ. संघवी यांच्या शेतात मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. ते नेहमी प्रमाणे शेतात काम करत होते. यात वना मोतीराम पाटील यांच्यासह समाधान उर्फ बाळु वना पाटील, अमोल वना पाटील, प्रतिभा वना पाटील हे कुटुंब शेतामध्ये काम करत होते.

दरम्यान, शेतात काम करत असतांना समाधान उर्फ बाळु (वय – २३) हा आपल्या आई-वडिल यांना पिण्यासाठी पाणी हवे या हेतूने बोहरी यांच्या शेतातील विहीरीवर गेला. पिण्यासाठी पाणी काढत असतांना त्याचा विहिरित तोल जाऊन तो विहिरित पडला. बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आल्या त्यांनी तात्काळ विहीरीकडे धाव घेतली. त्यांनी पाहिले की मुलगा समाधान विहिरीत पडला. यामुळे त्यांनी समाधानला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, यासाठी दोर विहिरित टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. समाधान हा मृत्युशी झुंज देत होता. वडील आक्रोश करत होते. परंतु शेजारी कोणीही नसल्याने समाधान हा खाली बुड़ुन तो तळासी गेला.

ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी डॉ. संघवी यांच्या शेताकडे धाव घेतली. आर्वे येथील एका तड़वी बांधवाने समाधान ला विहीरीतुन बाहेर काढत तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी समाधान यास मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत. अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचा समाधान याच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content