यावलचे बस स्थानक मोजतेय शेवटच्या घटका !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकाची वास्तू अतिशय जीर्ण झाली असून ती अक्षरश: शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून आले आहे.

तालुक्याचे ठिकाण असणार्‍या यावल येथील बस स्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. यावल येथील एस टी आगार हे विविध समस्यांचे माहेरघर बनले असुन, पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून बांधलेली बसस्थानकाची पडकी ईमारत,जुनाट व नादुरूस्त झालेली आहे. बसस्थानकाच्या आवारात उपहारगृह नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यशासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील जवळ पास सर्व एसटी आगारातील बसस्थानकांच्या इमारतींचे नुतनीकरण झाले आहे. एवढेच नव्हे तर यावल तालुक्यात असलेल्या फैजपुर शहरातील बसस्थानकाची वास्तू देखील बांधली जाते मग यावलच्या बसस्थानकाची नविन इमारत का बांधली जात नाही ? असा प्रश्न प्रवाशांना कायम पड़त असतो.

दरम्यान, येथील बस स्थानकात अनेक अडचणी देखील आहेत. यात यावल आगाराच्या बसेस या जुनाट आहेत. त्यात प्रवाशांची मागणी असतांना देखील लांब पल्यांचे शेड्युल सोडण्यात येत नाही. अशा प्रकारची एकंदरीत अवस्था असतांना देखील उत्पन्नाच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातील ईतर एसटी आगाराच्या तुलनेत उत्पन्नात कुठच मागे न दिसणारे यावलचे एस. टी. आगार हे मात्र मागील अनेक वर्षापासुन आहे त्याच अवस्थेत आज ही दिसत आहे.

एस.टी. महामंडळ आणि लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे यावल येथील बस स्थानकाची दुर्दशा झाली असली तरी याकडे कुणी पाहण्यास तयार नसल्याचे आजचे चित्र आहे. याची दखल घेऊन आता तरी याकडे लक्ष द्यावे आणि याची डागडुजी करावी अथवा येथे नवीन वास्तू उभारावी अशी मागणी शहरासह तालुक्यातून होत आहे.

Protected Content