नाथाभाऊंची बदनामी करणार्‍यांना धडा शिकवणार : अनिल महाजन

पाचोरा प्रतिनिधी | ईडी कारवाईच्या नावाने नाथाभाऊंची सोशल मीडियात बदनामी करण्याचे षडयंत्र ओबीसी विरोधकांनी रचले असून आपण या लोकांना धडा शिकवणार असल्याचा इशारा ओबीसी जनक्रांती परिषदेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन प्रकरणात चौकशीची कारवाई सुरू आहे. यातच त्यांच्याबाबत काल सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली होती. याबाबत अनिल महाजन यांनी एक पत्रक जारी केले आहे. यात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विरोधकांकडून एकनाथराव खडसे यांची मालमत्ता जप्त झाली, नोटीस आली, ईडीचे पथक आले अशी सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. पण असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक सोशल मीडियावर बदनामी करत आहे. यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी व यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावण्याची तयारी खडसे समर्थकांनी जिल्ह्यात केली आहे.

यात पुढे म्हटले आहे की, बहुजन नेतृत्वाला संपवण्याचा डाव आखणारे यांना फक्त एकनाथराव खडसेच दिसत आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. शेतकर्‍यांच्या समस्या यांना दिसत नाही पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टी सुरू आहे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महापूर आल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संसार उघड्यावर आला आहे. यावर बोलायला कोणी तयार नाही. नाहक बदनामी म्हणून बहुजनांचे नेते एकनाथ खडसे यांची बदनामी करून अघोरी आनंद घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. अशा लोकांवर आता खडसे समर्थकांकडून गावोगावी नजर ठेवण्यात येणार आहे. आणि या लोकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ खडसे समर्थक केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यात देण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, एकनाथराव खडसे झुंजार व्यक्तिमत्त्व आहे शोषित, पीडित, वंचितांचा आवाज आहे. यांचा आवाज कोणी दाबु शकत नाही आणि सर्वात महत्वाचे एकनाथ खडसे यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे अशा अनेक किती चौकश्या झाल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही. राजकारणातील हुकमी एक्का असणारा एकनाथराव खडसे लवकरच राजकारणात व मंत्रिमंडळ मध्ये सक्रिय दिसतील यात काही शंका नाही. पण आता हे नक्की आहे नाथाभाऊ यांची सोशल मीडियावर बदनामी करणार्‍या विरोधकाना आम्ही त्यांचे समर्थक नक्कीच धडा शिकवणार आहोत. या सर्व प्रकारावर जिल्ह्यात खडसे समर्थक यांची लीगल टीम व सोशल मिडिया टीम लक्ष ठेऊन असणार आहे. एकनाथ खडसे यांची बदनामी करून आघोरी आनंद घेणार्‍यांना आता खडसे समर्थक जसे तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अनिल महाजन यांनी या निवेदनात दिलेला आहे.

Protected Content