मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून श्री समर्थ सायन्स क्लासेस (निळे कोचिंग अकॅडमी) चे समन्वयक व शिक्षक मंगेश जगन्नाथ निळे यांना डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड” जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
AYSA – Aspiring Young Scientist Award Ceremony 2025-2026 अंतर्गत १२ मे २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगेश निळे यांना “इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मुक्ताईनगरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगेश निळे यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि नवोन्मेषाची आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या कौशल्याला वाव द्यावा यासाठी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी MSAT (Mathematics & Science Ability Test), GREAT (General Reasoning English Aptitude Test) तसेच RoboQuest यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयीची जिज्ञासा वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे फाउंडेशनने विशेष कौतुक केले आहे.
मंगेश निळे यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावर प्रगतीची नवी प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.



