उभ्या ट्रकला चारचाकी कार धडकली : एक ठार; तीन जखमी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लासगाव जवळ उभ्या ट्रकला चारचाकी कार धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे पहाटे घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील लासगाव गावा नजीक रस्त्याच्या कडेला जळगांवच्या दिशेने विरुध्द बाजूला एम. एच. २६ एच ५२६५ या क्रमांकाचा अवजड ट्रक हा चालकाने उभा केला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास जळगांवहुन पाचोर्‍याच्या दिशेने येणार्‍या एम. एच. ०४ एच. एफ. ८२८३ या क्रमांकाच्या कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इस्माईल शेख अक्रम (वय – ४०) रा. मालेगाव हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सोबत असलेले शेख जाकीर शेख जहांगीर (वय – ३५ रा. फार्मसी कॉलेज जवळ, मालेगाव) , शेख सुलतान शेख उस्मान (वय – ३८ रा. मालेगाव), शेख कलीम शेख इब्राहिम (वय – २८ रा. मालेगाव) आणि चालक शेख खान अनवर खान (वय – ३७) रा. मालेगाव हे जखमी झाले आहेत.

ट्रक चालकाने रॉंग साईडला उभा केलेला ट्रक हा रात्रीच्या अंधारात न दिसल्याने हा अपघात घडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या अपघातातील मयत शेख इस्माईल शेख अक्रम यांचेवर जळगांव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत शेख इस्माईल शेख अक्रम यांचेवर शोकाकुल वातावरणात मालेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या अपघातात जखमी झालेल्यांवर जळगाव येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Protected Content