अमोल शिंदे यांच्यामुळे माजी सैनिकांना मिळाले कार्यालय !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी माजी सैनिकांना संपर्क कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.

याबाबत वृत्त असे की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचोरा तालुक्यातील सर्व माजी सैनिक व त्यांचे परिवारासाठी तसेच शहीद सैनिकांच्या परिवाराला येणार्‍या विविध समस्यांच्या निराकरणासाठी भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला पाचोरा सेंट्रल मॉल मध्ये एक संपर्क कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कार्यालय वीर जवान माजी सैनिक संस्था, पाचोरा या संस्थेच्या माध्यमातून सुरू असणार आहे.

स्वातंत्र्यदिनी या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच शाहिद सैनिकांच्या परिवाराचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा माजी सैनिक कार्यालयाचे कल्याणकारी अधिकारी अनुरत वाकडे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे व नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, लष्करातील सैनिक व माजी सैनिक हा एक असा घटक असतो की, त्याच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण ते सीमेवर लढत असतात व देशाचे संरक्षण करत असतात म्हणूनच आज आपण हे सुरक्षित जीवन जगू शकतो. तसेच पाचोरा तालुक्यातील माजी सैनिक यांना उपलब्ध करून दिलेले हे कार्यालय हे माझे कर्तव्य समजतो त्यामुळे आपण याबद्दल आभार मानू नका असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमाला माजी सैनिक संघ संचालक बाळू पाटील, वीर जवान माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मेजर सिताराम पाटील आदी पदाधिकारी व सेवानिवृत्त सैनिक, त्यांचा परिवार तसेच शहीद सैनिकांचा परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content