पाचोरा, नंदू शेलकर (लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याची माहिती समोर येताच तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. तर शिंदे यांच्यासोबत आप्पांचे अतिशय निकटचे संबंध असून गेल्या वर्षी त्यांनी आकस्मीक गुप्त भेट दिल्यानंतर हे नाते अजून घट्ट झाल्याची चर्चा होती. आज यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०१२ रोजी पाचोरा येथे गुप्त भेट दिली होती. त्यांचा हा दौरा खासगी असल्याचे सांगत याचे विवरण प्रसारमाध्यमांना देण्यात आले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील मंदिरात नवस केला होता; त्यासाठी दर्शनासाठी म्हणून ते आल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याला दुजोरा दिला होता.
याच दौर्यात एकनाथ शिंदे यांनी पाचोरा व भडगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दीकर यांच्यासोबत बंदद्वार चर्चा केली होती. यामुळे तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. तथापि, किशोरआप्पा पाटील यांनी नंतरच्या काही महिन्यांमध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव शहरात अनेक कामे करून घेतली. अर्थात, एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतेच. म्हणजेच या दोन्ही मान्यवरांमध्ये मोठ्या प्रमाणात सलोख्याचे वातावरण दिसून आले होते. या पार्श्वभूमिवर, काल रात्रीपासून किशोरआप्पा पाटील हे नॉट रिचेबल झाल्यानंतर मतदारसंघातील जनतेला हाच दौरा पुन्हा एकदा आठवू लागला असून याबाबत खमंग चर्चा रंगली आहे.