अखेर ठरले : एरंडोलमधून डॉ. सतीश पाटलांना शरद पवार गटाची उमेदवारी !

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स संपला असून एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे लढणार आहेत. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बहुतांश उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी एरंडोल-पारोळ्याचा तिढा सुटत नव्हता. येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला असल्यामुळे शिवसेना-उबाठा पक्षाने या मतदारसंघावर दावा ठोकला होता. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही यावरील आपला दावा सोडला नव्हता. याचमुळे येथे मोठा तिढा निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमिवर आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात एरंडोल मतदारसंघातून डॉ. सतीशअण्णा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे आता ते तुतारी या चिन्हावर लढणार असल्याचे निश्चीत झाले आहे. यांचा सरळ मुकाबला महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या सोबत होणार असून अनेक अपक्ष देखील जनतेचा कौल मागणार आहेत. यात बाजी कोण मारणार ? हे निकालातून समोर येणार आहे.

डॉ. सतीश भास्करराव पाटील यांच्या घराण्याला राजकारणाची परंपरा आहे. त्यांचे वडील भास्करराव पाटील हे विधानसभेवर दोनदा निवडून गेले होते. 1997 साली त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. सतीश पाटील जिंकून आले होते. यानंतर 2004 आणि 2014 साली त्यांनी विजय मिळाला होता. आता ते पुन्हा जनतेचा कौल मागण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Protected Content