
पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या उत्सवमय कार्यक्रमांना शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः सायंकाळी काढण्यात आलेली भव्य पालखी मिरवणूक हे या उत्सवाचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात शहरातील कृष्णापुरी येथील समर्थ पेट्रोल पंपाजवळील नविन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठेने झाली. त्यानंतर सकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व मान्यवरांचा सत्कार करून समाजातील शिक्षण व प्रेरणेला चालना देण्यात आली. दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचा भव्य भंडारा संपन्न झाला.
दुपारी तीन वाजता संत सेना महाराज यांच्या पालखीची मिरवणूक उत्साहात सुरू झाली. विठ्ठल रखुमाई मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक कृष्णापुरी, देशमुखवाडी, आठवडे बाजार, जामनेर रोड, शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, महात्मा फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचली. मिरवणुकीदरम्यान शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.
डी.जे.च्या गजरात तरुणांनी व भगिनींनी जल्लोषात नृत्य करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन नरेश रमेश गर्गे (अध्यक्ष), योगेश चित्ते (उपाध्यक्ष), रमेश वारुळे (सचिव), बारकु चित्ते (खजिनदार), फकीरा शिरसाठ (सहसचिव) यांच्यासह कार्यकारी मंडळ व सल्लागार, विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रमात समाज बांधव, महिला, तरुण, तरुणी यांची उपस्थिती लक्षणीय होती. सामाजिक ऐक्य, परंपरेची जपणूक व नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा पाचोरा शहरासाठी एक आदर्श ठरला.



