कारची मोटरसायकलला धडक : दोघे गंभीर जखमी

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेडी ते आंबे वडगाव गावा दरम्यान मारुती सुझुकी इको कार व मोटरसायकलची जोरदार धडक होवुन यात मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले असुन जखमींवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोयगाव (जि. औरंगाबाद) नारळीबाग येथील रहिवासी आशा स्वयंसेविका सविता सुनिल काकडे (वय – ३५) व विष्णु शालिक राजनकर (वय – २९) रा. सोयगाव (जि. औरंगाबाद) हे दोघे बचतगटाचे पैसे भरण्यासाठी मोटरसायकल (क्रं. एम. एच.२० – एफ. झेड. ५९३७) पाचोरा येथे गेले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वरखेडी ते अंबे वडगाव दरम्यान वरखेडी येथून जवळच असलेल्या हाजी इस्माईल भैय्या यांच्या ऑईल मिल जवळ पहुर कडुन भरधाव येणाऱ्या मारुती सुझुकी इको कार (क्रं. एम. एच. ०२ – सी. झेड. ८३९९) ने मोटरसायकला जोरदार धडक दिली.

या अपघातात सविता काकडे व विष्णू राजनकर हे गंभीर जखमी झाले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात घडताच जोरदार आवाज आल्यामुळे याच रस्त्याजवळ शेतात काम करत असलेले वरखेडी ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित रुग्णवाहिका बोलाऊन जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान मारुती सुझुकी ईको गाडी चालक परशुराम पाटील (रा. राजुरी ता. पाचोरा) हा अपघाताच्या ठिकाणी न थांबता सरळ पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला हजर झाला असुन घटनेचा पुढील तपास पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस करत आहेत.

Protected Content