Home Cities पाचोरा संविधान दिनी समता सैनिक दलाचे पाचोऱ्यात धरणे आंदोलन 

संविधान दिनी समता सैनिक दलाचे पाचोऱ्यात धरणे आंदोलन 

0
1


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संविधान दिनाचे औचित्य साधून समता सैनिक दलातर्फे समाजबांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या आवारातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भारतीय संविधान आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार सुरक्षित राहावेत, या उद्देशाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून देशपातळीपासून राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरापर्यंत विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला जातो. संविधान दिनानिमित्त पाचोरा येथे आयोजित आंदोलनातून स्थानिक प्रश्नांसह शेतकरी, शिक्षण, सामाजिक न्याय आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.

आंदोलनकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पाचोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. रोहित पठारे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला शासकीय योजनांमधून आर्थिक मदत व मोबदला द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तालुक्यातील मराठी शाळांची दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी नवीन वर्गखोल्या मंजूर कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळतील, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय सार्वजनिक रेशन दुकानांचा दर्जा सुधारून लाभार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

वानेगाव येथील बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजबांधवांसाठी असलेल्या दफनभूमीच्या जागेची अधिकृत मोजणी करून संबंधित समाजाच्या नावाने उतारा द्यावा आणि जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गोराडखेडा खुर्द येथील गट क्रमांक १०५ मधील खुल्या जागेवरील अतिक्रमणाची चौकशी करून ते हटवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच गोराडखेडा खुर्द येथील पोलीस पाटलांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनात समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष अशपाक शेख, शहराध्यक्ष प्रविण वाघ, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर सावळे, अनिल भालेराव, खंडू सोनवणे, जयाबाई सोनवणे, सरला गायकवाड, आशा ब्राह्मणे, इंदू बाविस्कर, मधुकर सोनवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound