पाचोरा नगराध्यक्षांच्या दालनास हार घालून निषेध

पाचोरा प्रतिनिधी । शहरात अतिवृष्टीमुळे भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनालाच हार घालून आपला निषेध व्यक्त केला.

पाचोर्‍यातील सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आता विरोधकांनी दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या कारभाराविरूध्द भाजपने होय करून दाखवल या शीर्षकाखाली पोस्टर प्रदर्शीत करून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाचोरा येथे सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. यात प्रामुख्याने भुयारी मार्गात पूर्णपणे पाणी साचून तलाव तयार झाल्याने हजारो नागरिकांना अनेक तासांपर्यंत अडकून रहावे लागले.

या सर्व प्रकारावरून भाजपने शहरात पोस्टरबाजी केली. त्यांनी नगरपालिकेने शहरवासीयांसाठी बोटक्लबची निर्मिती करून दाखविल्याबद्दल जाहीर आभार मानणारे टीकेचे पोस्टर शहरातील कॉलन्यांमध्ये लावले. त्यासोबतच आमदारांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आरोप करत, शहरातील विविध भागांमधील घाणीने भरलेल्या गटारी, जागोजागी कचर्‍याचे साचलेले ढीग, भुयारी मार्गात साचलेले पाणी, निकृष्ट दर्जाचे तयार केलेले रस्ते व त्यावर झालेले खड्डे, चिखल आदी निकृष्ट दर्जाच्या कामाची छायाचित्रे काढून त्यांना लोणार सरोवर, जळगाव येथील मेहरूण तलाव, आनंदसागर येथील कारंजा, वॉटरपार्क, तसेच मोफत रुग्णालयात घेऊन जाणारा रस्ता अशा उपमा देऊन उपरोधात्मक टीका करणारे पोस्टर लावून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली.

दरम्यान, या सर्व प्रकारावरून भाजपने पदाधिकारी नगराध्यक्ष संजय गोहिल यांचा सत्कार करण्यासाठी गेले. याप्रसंगी नगराध्यक्षांचे दालन बंद असल्याने त्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वारालाच हार व श्रीफळ वाढवून आभारपत्र चिकटवून सत्ताधार्‍यांचे आभार मानण्यात आले. भाजप शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस दीपक माने, गोविंद शेलार, संजय पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस भय्या ठाकूर, कुमार खेळकर, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, किशोर संचेती, रमेश शामनानी आदी उपस्थित होते.

Protected Content