थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – प्रादेशिक संचालक रंगारी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणे हा महावितरणचा उद्देश नाही. परंतू महावितरणसाठी वीजबिल वसुली ही आज सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे परिमंडल कार्यालयाला दिलेले विजबिल वसुलीचे उध्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी आणि वीज बिल वसुली करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक संचालक नागपूर  सुहास रंगारी वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी झाले आणि थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मार्च हा आर्थीक वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि दिलेल्या उध्दीष्ठानुसार परिमंडलाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून १९५ कोटी ७८ लाख रूपयाचे थकीत वीजबिल वसुल होणे गरजेचे आहे. परंतू मागील तेवीस दिवसात केवळ ९३ कोटी ९९ लाख रूपयेच वीजबिलाचे वसुल झाल्याने उर्वरीत १०१ कोटी ७९ लाख रूपयाच्या वसुलीसाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनात परिमंडलात विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयानुसार वीजबिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत महावितरण कर्मचारी हा ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन वीजबिल भरण्याचे आग्रह धरत आहे.

परिमंडलात दिलेल्या उध्दीष्ठानुसार पुढील आठ दिवसात प्रत्येक दिवसाला अकोला जिल्ह्यात ४ कोटी ४५ लाख,बुलडाणा जिल्ह्यात ७ कोटी ३० लाख आणि वाशिम जिल्ह्यात २ कोटी ७८ लाख रूपये वसुली होणे महावितरणसाठी अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे परिमंडलातील थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरण्यास प्रतिसादच देत नसेल त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश प्रादेशीक संचालक यांनी मोहिमेदरम्यान दिलेत. प्रादेशीक संचालकासोबत मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हरीष गजबे, पवनकुमार कछोट ,सुरेंद्र कटके वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत परिमंडलात १ लाख ७८ हजार घराच्या छतावर सोलार पॅनेल बसविण्याचे उध्दीष्ठ आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना या योजनेत सहभागी करण्यासाठी त्यांना सहकार्य करून प्रोत्साहन द्या, त्यांना या योजनेचा फायदा सांगा. तसेच ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यावर भर देवून परिमंडलातील सर्वच ग्राहकांना अचूक वीजबिल देता येईल यासाठी प्रयत्न करा. रिडींग होत नसलेले ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यापेक्षा त्यांना मीटर रिडींग कक्षेत घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. पैसे भरून प्रलंबित असलेल्या आणि निधी उपलब्ध असलेल्या घरगुती आणि कृषी ग्राहकांना तत्पर वीजजोडणी देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुढील आठ दिवसात पूर्ण कराव्या लागणाऱ्या वसुलीच्या उध्दीष्ठात अकोला जिल्ह्यात अकोला ग्रामीण विभाग ११ कोटी ५७ लाख, अकोला शहर विभाग १४ कोटी ५७ लाख आणि अकोट विभागातून ५ कोटी ४ लाख रूपये वसुल करायचे आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातून बुलडाणा विभाग २१ कोटी ४८ लाख, खामगाव विभाग १९ कोटी ५३ लाख, मलकापूर विभाग १० कोटी ११ लाख आणि वाशिम विभागातून १९ कोटी ४९ लाख रूपयाचे थकीत वीजबिल वसुल करायचे आहे.

सार्वजनिक सुट्टीला सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे

महावितरण वीजबिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारात पोहचत आहे.ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्टीतही सुरू ठेवण्यात आली आहे.याशिवाय ग्राहकांना महावितरण मोबाईल एप ,संकेतस्थळ यासोबत ऑनलाईन वीजबिल भरण्याचीही सोय उपलब्ध आहे.त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणची नाईलाजास्तव होणारी कटू कारवाई टाळत वीजबिल भरून सहकार्य करावे.

Protected Content