बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून एकूण 79 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता बीडमध्ये दाखल एकूण 79 गुन्ह्यांपैकी 36 गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. या संदर्भात बीड पोलिसांच्या वतीने न्यायालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आंदोलनादरम्यान राज्यात सर्वाधिक हिंसाचार हा बीड जिल्ह्यामध्ये झाला होता. यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची घरे जाळण्यात आली होती. तसेच कार्यालय आणि हॉटेलला देखील आग लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील झाले होते. यातच रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण 79 गुन्हे पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आले होते. बीड पोलिसांनी यापैकी आता 36 किरकोळ स्वरूपातील गुन्हे बीड जिल्हा सत्र न्यायालयात मागे घेण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.