जळगाव प्रतिनिधी । येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे उद्या ३१ डिसेंबर २०२० रोजी व्यसनमुक्ती चेतना पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यातून शहरासह ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच सामाजिक संस्थेच्या सहभागाने ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा हा उपक्रम देखील राबविला जाणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी मद्य प्राशन करण्याचे प्रमाण दरवर्षी आढळून येत आहे. यात तरुणांचे प्रमाण मोठे आहे. व्यसनांमुळे घरादाराची राखरांगोळी होते. मानसिक, शारीरिक, आर्थिक पतनामुळे मनुष्याचा विवेक नष्ट होतो. म्हणून व्यसनाला बदनाम करण्यासाठी चेतना पदयात्रा शहरातून ग्रामीण भागात काढण्यात येणार आहे.
शिवतीर्थ मैदानातून सकाळी ८ वाजता हि पदयात्रा निघणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पदयात्रा टॉवर चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, ममुराबाद नाका, ममुराबाद, विदगाव मार्गे रिधुर निघून तेथील अवचित हनुमान मंदिर येथे समारोप होणार आहे.
या पदयात्रेत सुमारे २५ जण सहभागी होणार आहेत. विविध ठिकाणाहून नागरिक पदयात्रेत सहभागी होणार आहे. मार्गामध्ये विविध ठिकाणी व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार असून त्याद्वारे समुपदेशक व चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते हे मार्गदर्शन करणार आहेत.
या पदयात्रेला सदिच्छा देण्यासाठी प्रवीण पाटील फौंडेशन, जनमत प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगाव, दिशा फाउंडेशन, जिंदगी फाउंडेशन यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पदयात्रेत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी ३१ रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ मैदानावर उपस्थिती द्यावी असे आवाहन चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.