विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून २७ ऑक्टोबर  ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या लक्षित घटकांतील व्यक्तींसाठी शनिवार, २ डिसेंबर २०२३ व रविवार, ३ डिसेंबर , २०२३ या दिवशी विशेष शिबिराचे प्रत्येक मतदान केंद्रावर आयोजनही करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली आहे.  प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री मतदारांनी करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा.

ज्या व्यक्तीचे १ जानेवारी, २०२४ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरुन द्यावा. सदर अर्हता दिनांकाला १८ वर्ष वय पूर्ण करणा-या मतदाराचे नाव त्या – त्या अर्हता दिनांकाला मतदार यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. तसेच https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारे सुध्दा मतदार आपली नाव नोंदणी करु शकतात.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्हयातील सर्व  विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या परिसरात संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन सदर पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे. असेही आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

Protected Content