जळगावात कृष्णानंदजी महाराज यांचे १७ पासून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन (व्हिडिओ)

IMG 20190714 162242

जळगाव (प्रतिनिधी ): शहरातील पीपल्स पीस फाऊंडेशनतर्फे ज्योतिषाचार्य कृष्णानंदजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ ते २४ जुलै या कालावधीत दुपारी ४ : ३० ते सायंकाळी ७ :३० दरम्यान हा श्रीमद्भावगत कथा सप्ताह शहरातील आकाशवाणी चौकाजवळील लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे होणार आहे. या सप्ताहामध्ये सातही दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्या कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेमध्ये ज्योतिषाचार्य कृष्णानंदजी महाराज यांनी दिली.

 

वैदिक काळापासून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना तृतीयपंथी ,देहविक्री करणाऱ्या महिला,भिकारी,तळागाळातील गरीब व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येतो . मात्र, या समाजापासून दूर समजल्या जाणाऱ्या या घटकाला जवळ आणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न कथेच्या माध्यमातून होणार आहे . ‘हम सब एक है ‘ हा संदेश समाजात पोहचवून अशा समाजापासून वंचित घटकालाही यथोचित सन्मान द्यावा हाच पीस पीपल्स फाउंडेशनचा उद्देश राहणार असल्याचे फौंडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी यांनी बोलतांना सांगितले .

वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
मनुष्याची आजची दिनचर्या किंवा परिस्थिती बघता त्याची शाररीक व मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आपण बघत आहोत. भौतिक सुखे मिळवित असतांना करावा लागणारा संघर्ष हे त्याचे प्रमुख कारण आहे. म्हणून आध्यात्मामध्ये स्वत:ला गुंतवणे, देवाचे स्मरण, चितंन करुन आध्यात्मिक उन्नती साधणे हा त्यावरील सोपा व एकमात्र उपाय आहे. याचा लाभ सर्वांना मिळावा, म्हणून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये सर्वांना सहभागी करुन घेता यावे, म्हणून सात दिवस वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ७ दिवसांचे विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे : दि. १७ जुलै रोजी श्रीमद् भागवत कथा महात्म्य;दि. १८ जुलै रोजी सुकदेव आगमन कथा प्रारंभ, दि. १९ जुलै रोजी ध्रुव चरित्र, भक्त प्रल्हाद कथा, दि. २० जुलै रोजी गजेंद्र मोक्ष, कृष्ण जन्मोत्सव , दि. २१ जुलै रोजी श्रीकृष्ण बाल लीला, गोवर्धन उत्सव , दि. २२ जुलै रोजी महारास, मधुरा गमन, रुख्मिणी विवाह , दि. २३ जुलै रोजी श्री सुदामाचरित्र, भागवत सार, कथा समाप्त , दि. २४ जुलै रोजी महायज्ञ व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय इतरही विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पीपल्स पीस फाऊंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी ,मनोज बियाणी, आनंद गांधी,किशोर ढाके , सुनील पाटील, सचिन घुगे, श्री पारेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content