जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने १०० “ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत” प्रशिक्षित केले जाणार आहेत.
विद्यापीठ परिक्षेत्रात ३०० ज्येष्ठ नागरिक संघ असून ज्येष्ठ नागरिकांसाठी या विभागाच्यावतीने सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. लॉकडाउनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुले परदेशात अथवा मोठ्या शहरांमध्ये गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरी एकाकीपणाचे जीवन जगत असल्याचे आढळून आले आहे. या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, किराणा, प्रवास, बँक व पोस्टाची कामे करणे यासाठी मदतीची गरज असते. जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यात या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी या विभागामार्फत दि. १० ते १४ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत १०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यापुर्वी सन २०२१ मध्ये ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. दि. १० ते १४ ऑक्टोंबर या कालावधीत तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींची भोजन व निवासाची व्यवस्था विद्यापीठामार्फत् केली जाणार आहे. तरी संलग्नित महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील प्रत्येकी १ विद्यार्थी व विद्यार्थिनीचे नाव संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांना दि. १६ सप्टेंबर पर्यंत कळवावे. असे आवाहन संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी केले आहे.