जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वर्षानुवर्षे ऐनकेन कारणाने प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी २७ जुलै रोजी आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे देण्यात आली. याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले आहे.
लोकन्यायालय म्हणजे काय? वाद उद्भवला तर तो शक्य तोवर सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे. गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत आणि कोणत्याही व्यक्तींमध्ये उद्भवलेला वाद समजुतीने मिटवत. ज्यांच्यापुढे वाद जाई ते गावातील आदरणीय आणि निष्पक्षपाती लोक असत. त्यालाच गावात गावपंचायत असे म्हणत सध्याचे लोक न्यायालय म्हणजे या गावपंचायतीचे आधुनिक रूप जेथे कायदा जानणाऱ्या निष्पक्षपाती लोकांचे न्याय मंडळापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडविते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे सांगण्यात आले की, मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हात या लोकअदालतीचे आयोजन केलेले असुन विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व जिल्हा वकील संघ, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत जळगांव जिल्हातील संपुर्ण न्यायालयात आयोजीत केली जाईल. जळगांव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. क्यु. एस. एम. शेख साो. तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखल पुर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीचे फायदे असे की, निकाल झटपट लागतो, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो, लोकन्यायालयाच्या निवाडया विरूध्द अपील नाही एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने कोणाचा ना जय होतो, ना हार होते, लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुता ही निर्माण होत नाही, कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अमंलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते, लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फि ची रक्कम मिळते.
त्याचप्रमाणे जळगांव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोड योग्य प्रकरणे देखिल त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्हातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपनी यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वणी कंपन्या, दुरध्वणी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्थावित केलेले आहे.
ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधीत सर्व पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, व जास्तीत जास्त खटले दि २७/०७/२०२४ रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत समोपचाराने निकाली करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे करण्यात आलेले आहे.