जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन दि. १२ व १३ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या संशोधन स्पर्धेत ३४७ प्रवेशिका असणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा घेण्यात आली. त्यामधील विजेत्यांचा विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत सहभाग राहणार आहे. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक या तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून त्यामध्ये १) कृषी व पशुसंवर्धन २) वाणिज्य, व्यवस्थापन व विधी ३) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ४) मानव्य विज्ञान, भाषा व ललितकला ५) वैद्यकीय व औषधीनिर्माण शास्त्र ६) विज्ञान या विषयातील मोड्युल व पोस्टर्स द्वारे विद्यार्थी आपले संशोधन सादर करणार आहे. ३४७ पैकी ३०६ पोस्टर्स व ४१ मोडयूल यांचा सहभाग आहे. मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात इंडियन केमीकल टेक्नॉलॉजीच्या जालना कॅम्पसचे संचालक प्रा. उदय अन्नापुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्ष राहतील. १३ डिसेंबर रोजी सायं. ४.३० वाजता कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होईल.
यावर्षीच्या स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेत सहभागी असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरण यापुर्वी घेण्यात आले असून त्यामध्ये गुणवत्तापुर्ण संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील पारितोषिक दिले जाणार आहे. अशी माहिती समन्वयक प्रा. जे.व्ही. साळी यांनी दिली.