जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सव २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठाच्या प्रांगणात होत असून या महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यावर्षी युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सव एकत्रित घेण्यात येत आहे. कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाच्या पुर्वतयारीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावर्षी विद्यापीठाच्या प्रांगणात हा महोत्सव होत असून विविध २६ कलाप्रकारामध्ये अंदाजे १५०० विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी सहभागी होणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. या महोत्सवाचे कार्याध्यक्ष म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे काम पहात आहेत. या आढावा बैठकीला प्र-कुलगुरू एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, यांच्यासह विविध समित्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. स्त्री सक्षमीकरण ही या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. ५ विविध रंगमंचावर हे कला प्रकार सादर होणार आहेत. पदवी प्रदान सभागृहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (रंगमंच क्र.१) हे नाव देण्यात आले आहे. सिनेट सभागृहाला राजमाता जिजाऊ रंगमंच (रंगमंच क्र.२) , सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहाला ताराराणी सभागृह (रंगमंच क्र.३), रासायनिक तंत्रज्ञान प्रशाळेच्या सभागृहाला राणी लक्ष्मीबाई सभागृह (रंगमंच क्र.४) आणि जैवशास्त्र प्रशाळेच्या सभागृहाला राणी दुर्गावती सभागृह (रंगमंच क्र.५) हे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेला शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी प्रारंभ हाईल. या दिवशी मिमिक्री, मुक अभिनय, वक्तृत्व, भारतीय समुह गान, स्वरवाद्य, तालवाद्य, शास्त्रीय गायन, स्पॉट पेंटीग, व्यंगचित्र आणि चिकटकला हे कला प्रकार सादर होतील.शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी प्रहसन,भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, वादविवाद पाश्चिमात्य समुह गान, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य एकल वाद्य संगीत, नाट्यसंगीत, मातीकला, स्पॉट फोटोची प्राथमिक फेरी, पोस्टर मेकिंग या स्पर्धा होणार आहेत. रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी भारतीय लोकसमुह नृत्य, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय सुगम संगीत, इन्स्टॉलेशन, रांगोळी, मेहंदी आणि स्पॉट फोटोची अंतिम फेरी या स्पर्धा होणार आहेत. सोमवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहणार आहेत अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.