स्टेशनरोड परिसरात एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनरोडवरील दत्त मंदिराजवळ एकाला धारदार शस्त्र मारून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवार १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय संजय अकोलकर वय-२०, रा. मारुती मंदिर जवळ, शिवाजीनगर, जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अक्षय अकोलकर हा रेल्वेस्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळील नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर रा. शिवाजीनगर हा तिथे आला. त्यावेळी त्याने अक्षयला ३०० रुपये मागितले. नाहीतर तुझ्या अंगावरील कोट दे असे सांगून अक्षयच्या अंगावरील कोट हिसकवण्याचा प्रयत्न करत असताना गजाननने धारदार शस्त्र काढून त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याच्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या अक्षयला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.

Protected Content