भुसावळ, प्रतिनिधी | औरंगाबादकडुन भुसावळकडे येणाऱ्या पिकअप व्हनमध्ये चोरीचे चंदनाचे लाकूड असल्याची मिळालेल्या खबरीवरुन भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी सापळा रचून गाडी थांबवली असता त्या २ लाख ७२ हजार रुपये किमतीचे चंदनाचे लाकूड आढळून आले. पोलिसांनी चंदनाच्या लाकडासह पिकअप व्हॅन व एकास ताब्यात घेतले आहे.
पिकअप व्हॅनमध्ये चंदनाच्या लाकडांची चोरी करुन भुसावळकडे येत आहे अशी गुप्तबातमी मिळाल्याने पो.निरीक्षक देविदास पवार, उप निरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फौजदार तस्लीम पठान पो.हे.कॉ. छोटु वैदय, पो.कॉ. कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, सचिन पोळ, करतारसिंग परदेशी, मंदार महाजन, बापुराव बडगुजर असे कर्मचारी नाहाटा चौफुली येथे लागलीच पोहचले. तेव्हा ४.३० वाजे दरम्यान पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन औरंगाबादकडुन सुसाट वेगाने भुसावळकडे येतांना दिसली. पोलीस पथकाने गाडी थांबविण्याचा इशारा केला असता त्यातील ड्रायव्हर व त्यासोबत असलेल्या व्यक्तिने गाडी दुर लावुन पळ काढला. मंजुनाथ सुकुमारन (वय-३४ रा. निल्लीरट्टा ता. निकराजे जि.कासारगोड राज्य केरळ) यास काही अंतरावर पथकाने ताब्यात घेतले. तर ड्रायव्हर पळुन जाण्यात यशस्वी झाला. या पथकाने गाडीची झडती घेतली असता त्यांना गाडीच्या चेसिसच्यावर चोर कप्प्यात चोरी करून आणलेली चंदनाची लाकडे आढळून आलेत. यात २ लाख ७२ हजार रुपये किमतीचे दिड ते अडीच फुट लांबीचे १०८.९३५ किलो ग्रँम वजनाने ३२ नग तसेच ३ लाख ७५ हजार किमतीची महेंद्रा कंपनीची पिकअप व्हॅन (क्र. एम.एच २० बी.टी.३९२४) असे एकूण ६ लाख ४७ हजार किमतीचा माल मिळाला. पोलिसांनी मंजुनाथ यास गाडीतील मालाची पावती व वाहतुकीची परवानगी आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने परवानगी नसल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.